धाराशिव (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला 45 मीटर उंच भगवा ध्वज हा केवळ ध्वज नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, स्वाभिमानाला आणि स्वराज्याच्या विचारांना नमन करणारे ऐतिहासिक प्रतीक आहे. या भगव्याकडे पाहताना प्रत्येक तरुणाने ‌‘महाराजांनी आपल्या काळात स्वराज्यासाठी काय केले आणि आपण आपल्या काळात समाजासाठी काय करणार हा प्रश्न स्वतःला विचारावा.इतिहासातून प्रेरणा घेऊन आधुनिक,सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या 45 मीटर उंच भगवा ध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री सरनाईक यांनी केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती.उषा गायकवाड ,नगराध्यक्ष नेहा काकडे,उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सुरज साळुंके,नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे वर्णन करताना त्यांनी हा दिवस धाराशिवच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा अभिमानाचा दिवस असल्याचे सांगितले.आकाशाला गवसणी घालणारा हा भगवा पराक्रम,त्याग,धर्म-संस्कृतीच्या रक्षणाची भावना आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top