तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील अंबिका नगर ते एसटी स्टँड तसेच एसटी स्टँड ते बाळूमामा मंदिर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पावसामुळे रस्त्यांवर चिखल आणि मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती अथवा डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील संबंधित रस्त्यांवर यापूर्वी मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच मुरूम टाकण्यात आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचून चिखल तयार होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.


शाळकरी मुले, वृद्धांची पायपीट धोकादायक

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून, या रस्त्यांवरून होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे. यासंदर्भात अंबादास गणपती माळी व भागवत हरिभाऊ जोकर यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंच, ग्रामपंचायत काटगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

 
Top