धाराशिव (प्रतिनिधी)- यमगरवाडी, ता. तुळजापूर भटके व विमुक्त विकास प्रतिष्ठान अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या एकलव्य विद्या संकुल आश्रम शाळेतील आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना व्यावसायिक व रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ‌‘विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र' सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव विठ्ठल काळे व उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून देणे, त्यांना रोजगारक्षम बनविणे आणि भविष्यात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी सक्षम करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, मोटार मेकॅनिक (टू-व्हीलर), फॅशन डिझायनिंग (शिलाई मशीन काम) आणि ब्युटी पार्लर, सीसीटीव्ही या सहा ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  या विविध ट्रेडसाठी प्रविण मुळे,वर्धमान दुरुगकर, रोहित शेरकर, दत्ता हंगरगेकर, संतोषी मिसाळ आणि शुभांगी लोहार हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामाचा अनुभव तसेच भविष्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये देण्यात येणार आहेत.

भटके व विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‌‘कौशल्य शिका... स्वावलंबी व्हा... उज्ज्वल भविष्य घडवा...' या संकल्पनेला या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक किसनराव अयाचित, कोषाध्यक्ष नरेश एकनाथ पोटे तसेच कार्यकारिणी मंडळातील सदस्य अभय कुलकर्णी, विजय  गिजरे, अशोक संकलेचा, ॲड. प्रदीपसिंग राजपूत, संतोष शिर्के, डॉ. प्रणिता गाडेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास एकलव्य माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर तसेच शाळेतील कर्मचारी ज्ञानेश्वर भुतेकर, राजाभाऊ कुंभार, संगीता पाचंगे, कोंडीबा देवकर, खंडू काळे, दत्ता भोजने, शालीवाहन वाघमोडे उपस्थित होते.

 
Top