भूम (प्रतिनिधी)-   खवा क्लस्टर भूम येथे महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सदिच्छा भेट देऊन क्लस्टरच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी खवा उत्पादन प्रक्रिया, आधुनिक इंडक्शन खवा मशीनचा वापर, दुग्ध प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञान तसेच क्लस्टरच्या माध्यमातून शेतकरी व दुग्ध उत्पादकांना उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.

या भेटीदरम्यान धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर, भूमच्या उपविभागीय अधिकारी ज्योती चौहान, भूमचे तहसीलदार जयवंत पाटील, परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे, वाशीचे तहसीलदार प्रकाश मेत्रे, भूमचे मंडळ अधिकारी विद्याधर कोळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी खवा क्लस्टरमधील उत्पादन व्यवस्था, यंत्रसामग्री, स्वच्छता, ऊर्जा बचत करणारी इंडक्शन प्रणाली तसेच खवा उद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. पारंपरिक खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनाचा दर्जा वाढविणे, इंधन व ऊर्जा खर्च कमी करणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती करणे या क्लस्टरच्या प्रयत्नांचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

खवा क्लस्टरच्या माध्यमातून भूम परिसरातील दुग्ध उत्पादक शेतकरी, खवा उत्पादक आणि ग्रामीण उद्योजकांना संघटित व्यासपीठ उपलब्ध होत आहे. खवा उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, शासकीय योजना आणि प्रशासकीय सहकार्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे खवा क्लस्टर भूमला नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यात खवा उद्योगाचा अधिक व्यापक संपूर्ण भारत देशात विकास करण्याचा विश्वास क्लस्टरचे चेअरमन विनोद जोगदंड व्यक्त केला.


 
Top