तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे सीईओ उपेंद्र तामोरे यांची अवघ्या 58 दिवसांच्या कार्यकाळानंतर बदली करण्यात आल्याने तुळजापूरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
उपेंद्र तामोरे यांनी 2 जून रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर तामोरे यांनी सर्वसामान्य भाविकांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत सशुल्क दर्शन आणि धर्मदर्शन रांगेचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मंदिरातील दर्शन व्यवस्थेत समानता आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः कष्टकरी आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांना याचा मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले होते. अल्पावधीतच कार्यक्षमतेची छाप पाडणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंदिरातील सुधारणा आणि विकासकामांची सातत्याने अंमलबजावणी होण्यासाठी लवकरात लवकर नव्या सीईओची नियुक्ती करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
