तुळजापूर  (प्रतिनिधी)- राज्यात गुटखामुक्त महाराष्ट्रासाठी कठोर भूमिका घेणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अवैध गुटखा विक्रीवर कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही, तीर्थक्षेत्र तुळजापूरात त्या आदेशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहरातील शेकडो टपऱ्यांमधून राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू असून, दररोज 30 ते 40 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा नागरिक आणि भाविकांमध्ये सुरू आहे.

श्रद्धेचे केंद्र असलेल्या तुळजापूरात अवैध गुटखा विक्री दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेक टपऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच उघडपणे गुटख्याची विक्री सुरू झाल्याचा आरोप होत आहे.


गुटखा माफिया मोकाट; जाळ्यात अडकतात फक्त कामगार?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाईच्या नावाखाली गुटखा वाहतूक किंवा वितरण करणाऱ्या दुचाकीस्वार कामगारांवरच गुन्हे दाखल होतात. मात्र, या अवैध व्यवसायाचे सूत्रधार असलेल्या गुटखा माफियांपर्यंत तपास पोहोचत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “खरे मास्टरमाइंड कोण? त्यांच्यावर कारवाई कधी?“ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.


चारही बाजूंनी होतोय पुरवठा

तुळजापूर शहराच्या चारही दिशांनी मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक पानटपऱ्या व छोट्या दुकानांमध्ये सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.


भाव तिप्पट-चौपट; मालामाल कोण?

अवैध विक्रीमुळे गुटख्याचे दर तीन ते चारपट वाढले असल्याची माहिती ग्राहकांकडून दिली जात आहे. वाढीव दर असूनही गुटखा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. या अवैध व्यवसायातून नेमका कोण मालामाल होत आहे? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.


भाविकांसह नागरिकांची कठोर कारवाईची मागणी

दररोज लाखो भाविक येणाऱ्या तीर्थक्षेत्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या अवैध गुटखा व्यवसायावर तातडीने मोठी कारवाई करून गुटखा पुरवठा साखळी उद्ध्वस्त करावी, मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी आणि तुकाराम मुंडे यांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाविक आणि तुळजापूरकरांकडून होत आहे.

 
Top