धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून महागाई, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्ट व्यवस्था तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने प्रभावी भूमिका मांडत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत खानापूर, ता. धाराशिव येथील (दि.17)नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रकाश रामचंद्र घायतीडक यांची धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच शंकर मधुकर सुतार, कुमोद संभाजी पवार, कांतीलाल जाधव, अनिल गरड आणि पांडुरंग गरड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश व नियुक्ती कार्यक्रम धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस गोरोबा झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला.
यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे तसेच नवनियुक्त तालुका सचिव प्रकाश रामचंद्र घायतीडक यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत व अभिनंदन केले. काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. खानापूर परिसरातील नागरिकांनी काँग्रेसवर व्यक्त केलेला विश्वास आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे धाराशिव तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
