कळंब (प्रतिनिधी) - कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाचे ‌‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक' असे नामकरण यापूर्वीच करण्यात आले होते. या चौकाचे सुशोभीकरण करून येथे उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या शिल्पाचे अनावरण 15 ऑगस्ट रोजी धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

महात्मा फुले चौक कृती समितीच्या वतीने मागील वर्षी तहसील कार्यालयासमोरील चौकास महात्मा फुले यांचे नाव देण्याबाबत नगरपालिकेकडे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनासोबत शहरातील सर्वपक्षीय तालुकाध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीत कार्यरत विविध संघटनांची पत्रे जोडण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करत तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी चौकाला ‌‘क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक' असे नाव देण्याचा ठराव मंजूर केला.त्यानंतर लोकनियुक्त पदाधिकारी निवडून आल्यानंतर कृती समितीने नगराध्यक्ष सुनंदाताई शिवाजी आप्पा कापसे, सर्व नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेते संजयजी मुंदडा यांच्याकडे चौकात महात्मा फुले यांचे शिल्प उभारण्याची मागणी केली. तसेच आमदार कैलास पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाने निधीची मागणी केली असता त्यांनी कोणताही विलंब न करता 10 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून त्याबाबतचे पत्र दिले.विविध निवडणुकांमुळे कामाला सुरुवात करण्यास विलंब झाला. मात्र सर्व आचारसंहिता संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात शिल्प उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अखेर 15 ऑगस्ट रोजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते या शिल्पाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सुनंदाताई कापसे, उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, विरोधी पक्षनेते संजयजी मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते तथा पर्याय सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तोडकर, जिल्हा परिषद धाराशिवचे समाजकल्याण सभापती विश्वासजी कोकणे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा तुषार शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला महात्मा फुले चौक कृती समितीचे अध्यक्ष टी. जी. माळी, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र खडबडे, सचिव संतोष भोजने, सहसचिव अरुण माळी, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र गोरे यांच्यासह बिभीषण यादव, अशोक खडबडे, हरी कुंभार, प्रा. संजय कांबळे, संतोष भांडे, प्रेम गोरे, सतपाल बनसोडे, दीपक माळी, रवी गोरे, धिरज दुधाळ, मनोज माळी, बाळासाहेब माळी, पोपट माळी, राहुल हौसलमल, किसन यादव, प्रताप यादव, महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, राजाभाऊ गायकवाड, अनिल हजारे, सौदागर गोरे, सतपाल बचूटे, ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ, भडंगे काका, सचिन क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने फुलेप्रेमी नागरिक उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या शिल्पामुळे कळंब शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, चौकाला सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 
Top