धाराशिव (प्रतिनिधी)- डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर फसवणुकीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सजग राहणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने ‌‘सायबर सुरक्षा' या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी 19 ऑगस्ट दुपारी चार वाजता धाराशिव शहरातील बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांचे यावेळी अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. आज मोबाईल बँकिंग, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन खरेदी-विक्री आणि विविध डिजिटल सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे व्यवहार सुलभ झाले असले तरी त्याचबरोबर बनावट लिंक, फेक कॉल, ओटीपीची मागणी, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, केवायसीच्या नावाखाली होणारी फसवणूक अशा विविध माध्यमांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. विशेषतः व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार होत असल्याने त्यांच्यासाठी सायबर सुरक्षेचे महत्त्व अधिक आहे.

या कार्यक्रमात सायबर गुन्हे कसे ओळखावेत, वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत डॉ. धनंजय देशपांडे सखोल मार्गदर्शन करणार आहेत. व्यापारी बांधवांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही या कार्यक्रमात विशेष भर दिला जाणार आहे. डिजिटल व्यवहार ही काळाची गरज बनली आहे. मात्र, सुविधा जितकी वाढते तितकीच सुरक्षिततेची जबाबदारीही वाढते. एका चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने किंवा अनोळखी व्यक्तीला संवेदनशील माहिती दिल्याने काही क्षणांत मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‌‘स्मार्ट वापरा, सुरक्षित राहा' हा संदेश आज प्रत्येक डिजिटल वापरकर्त्याने अंगीकारणे आवश्यक आहे.


डिजिटल सुरक्षितता आणि साक्षरता काळाची गरज 

सायबर सुरक्षा ही केवळ तज्ज्ञांची जबाबदारी नसून प्रत्येक डिजिटल वापरकर्त्याची गरज आहे. सुरक्षित डिजिटल व्यवहारातूनच आर्थिक व्यवहारांवरील विश्वास कायम राहू शकतो. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेऊन सायबर फसवणुकीपासून स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि व्यवसायाचे संरक्षण करावे, यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने या महत्वपूर्ण अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क खुला असणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top