धाराशिवमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन; ‘हरित धाराशिव २.०’ मध्ये अहिल्या सखी मंचच्या लेकींचा स्वयंस्फूर्त सहभाग!
धाराशिव:
‘अहिल्या सखी मंच’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, धाराशिव’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी धाराशिव येथे अत्यंत आदराने साजरी करण्यात आली. या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर चौकात जमलेल्या महिलांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याला व सामाजिक योगदानाला विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अहिल्या सखी मंचच्या अध्यक्षा डॉ. शैलजा पैकेकर, अखिल भारतीय ६ व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा अँड.जयश्री तेरकर, अर्चना मैंदाड, लक्ष्मी देवकते, रेखा जेवळीकर, भागीरथी शिंपले, लता झोरे, पूजा महानवर व ढेकणे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश शिवाजीराव सोनटक्के, लिंबराज डुकरे, राजपाल दूधभाते, संदीप वाघमोडे, सुभाषअण्णा मैंदाड आणि डॉ. सुमित पालवे यांचीही विशेष उपस्थिती होती. यादरम्यान राजमातांच्या विचारांचा वसा पुढे चालवण्याचा दृढ संकल्प उपस्थित महिलांनी केला.
तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच, "राजमाता अहिल्यादेवी आणि आजची अहिल्याची लेक" यांच्यातील विचार व परिस्थितीतील तफावत या गंभीर विषयावर उपस्थितांनी मनमोकळे चिंतन केले. अहिल्यादेवींच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प अहिल्याच्या लेकींनी केला.
राजमातांच्या लोककल्याण व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची प्रेरणा घेत, याच महिलांनी दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव २.०’ या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. पर्यावरण रक्षणाची नैतिक जबाबदारी मानून अहिल्या सखी मंचच्या महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत वृक्षारोपण केले आणि विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीतून पुढे चालवला.