तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मराठवाड्यात नवी धार मिळाली आहे. संघटनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी रविंद्र भीमाशंकर इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडीबद्दल संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रविंद्र इंगळे हे गेल्या 15 वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सक्रिय आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, पीक विमा, हमीभाव, उसाचा एफआरपी यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांशी असलेला त्यांचा थेट संपर्क आणि संघटन कौशल्य यामुळेच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना इंगळे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटे आणि चुकीच्या धोरणांना तोंड देत आहे. स्वाभिमानीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचा आवाज अधिक ताकदीने सरकारपर्यंत पोहोचवीन. कर्जमाफी, पीकाला हमीभाव आणि सिंचन हे आमचे प्राधान्य असेल असे इंगळे म्हणाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणीमध्ये धाराशिवचे धनाजी पेंदे, राजाभाऊ हाके, नेताजी जमदाडे तसेच शहाजी सोमवंशी हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
