धाराशिव (प्रतिनिधी)- सातेफळ (ता. कळंब) येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा ॲड. दिलीप कांबळे यांच्या ‌‘वैरदावा' या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या हस्ते रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर होते.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजा जगताप यांनी केले. त्यांनी ॲड. कांबळे यांच्या सुमारे चार दशकांच्या लेखनप्रवासाचा आढावा घेतांना सांगितले की,लेखक दिलीप कांबळे यांच्या वैरदावा कथासंग्रहातील कथा गावखेड्यातील शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,वंचित माणसांच्या व्यथा,वेदना यांचे चिञण करतात तसेच कांबळे यांच्या कथेतील पाञे निसर्गाशी लढतानाच नैतिकतेची शिकवण देतात.

‌‘वैरदावा' कथासंग्रहातील कथा तेरणा नदी परिसर, सातेफळ आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहेत. ग्रामीण समाजजीवन, रूढी-परंपरा, सामाजिक विषमता, मानवी नातेसंबंध, स्त्रीजीवन आणि बदलते सामाजिक वास्तव या विषयांचे चित्रण कथांमधून करण्यात आले आहे.

प्रमुख पाहुणे योगीराज वाघमारे यांनी कथासंग्रहातील ‌‘वैरदावा', ‌‘हाक', ‌‘पारू', ‌‘मदत', ‌‘वसुली',  आणि ‌‘संशय' या कथांचा उल्लेख केला. ‌‘वैरदावा'मध्ये माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष, तर ‌‘स्वप्नाली'मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्न मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कांबळे यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवनातील वास्तव आणि सामाजिक प्रश्न प्रभावीपणे पुढे येतात, असे वाघमारे म्हणाले.

प्रा. के. व्ही. सरवदे यांनी कथासंग्रहातील ग्रामीण जीवनाचे चित्रण, सामाजिक वास्तव, उपहास आणि विडंबन यांचा उल्लेख केला. कांबळे यांच्या कथांमध्ये ग्रामीण परिसरातील बारकावे आणि बोलीभाषेचा वापर प्रभावीपणे झाल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रीजीवनातील संघर्ष मांडणाऱ्या कथांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

प्रा. डॉ.तुपेरे यांनी कांबळे यांच्या 40 वर्षांच्या लेखनप्रवासाचा गौरव केला. संख्यात्मक लेखनापेक्षा आशयपूर्ण आणि गुणात्मक लेखन महत्त्वाचे असल्याचे सांगत ‌‘वैरदावा' हा ग्रामीण आणि वंचित समाजजीवनाचे वास्तव मांडणारा कथासंग्रह असल्याचे त्यांनी नमूद केले. कथांमधून सामाजिक परिवर्तन, समता आणि बंधुतेचा विचार पुढे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.ए. के. मंजुळकर यांनी ग्रामीण जीवनाचे अनुभव साहित्याच्या माध्यमातून मांडल्याबद्दल ॲड. कांबळे यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील बोलीभाषा, रूढी-परंपरा आणि सामान्य माणसाच्या जीवनातील बारकावे त्यांच्या कथांमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी साहित्यनिर्मिती आणि वाचनाला प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.


‌‘आठवीतील अपमानाच्या प्रसंगातून लेखनाची प्रेरणा मिळाली'

मनोगत व्यक्त करताना ॲड. दिलीप कांबळे यांनी आपल्या लेखनप्रवासातील अनुभव सांगितले. आई, वडील आणि आपण असे तीन जणांचे कुटुंब असून बालपणापासूनच ग्रामीण जीवनातील माणसांचे प्रश्न आणि सामाजिक वास्तव जवळून पाहिल्याचे त्यांनी सांगितले. माणसाचा स्वाभिमान, गावातील सामाजिक संबंध आणि गावाबाहेरील व्यक्तीकडे पाहण्याची मानसिकता यांचे अनुभव लेखनासाठी महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

इयत्ता आठवीत असताना इतिहासाच्या शिक्षकांकडून झालेल्या अपमानाच्या प्रसंगाने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. इयत्ता दहावीत असताना लोकनाट्य लिहिले. त्यानंतर लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वाचनाची आवड वाढली. विविध साहित्य आणि सामाजिक विचारांचे लेखन वाचत गेल्याने लेखनाला दिशा मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनिषा कदम यांनी केले. यावेळी प्रा. चंदनशिवे, धाराशिव वकील मंडळाचे अध्यक्ष चौरे, प्राध्यापक, साहित्यिक, पत्रकार, लेखकाचे कुटुंबीय आणि सातेफळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार ॲड. दिलीप कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागातील प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर,प्रा.डॉ.वैशाली बोबडे यांनी सहकार्य केले.

 
Top