तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भातंब्री शिवारातील शेतरस्त्याचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून रखडला असून, शेतरस्ता उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडल्या   आहे त एका शेतकऱ्याच्या कथित विरोधामुळे इतर शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या शेतरस्त्याची यापूर्वी अनेकदा पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे प्रक्रिया पुढे सरकली नाही. परिणामी, मोजणी अधिकारी, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेबाबत शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकऱ्यांचा एवढा खर्च या क्षेत्रासाठी झाला आहे की यात शेतकरी आणि आणखी चार एकर जमीन घेतले असते.

गेल्या चार वर्षांत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, मोजणी अधिकारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना वारंवार घटनास्थळी जावे लागले. शासकीय यंत्रणेचा वेळ आणि सार्वजनिक निधी खर्च होऊनही शेतरस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने आता करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. या घटनांशी संबंधित व्हिडिओ फुटेज उपलब्ध असल्यास त्याची निष्पक्ष तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.


‌‘शेतरस्ता मोहिमे'लाच हरताळ? आता करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे 

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विविध मोहिमा राबविल्या जात असताना, भातंब्रीतील शेतरस्त्याचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित राहणे गंभीर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शासकीय कामात अडथळा आणला असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार का? तसेच पूर्वीच्या मोजणीचे अहवाल, कारवाईची कागदपत्रे आणि उपलब्ध व्हिडिओ फुटेज तपासून तातडीने शेतरस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


चार वर्षांची कोंडी फोडण्याची मागणी

शेतरस्ता मोकळा न झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने केवळ कागदोपत्री प्रक्रिया न करता प्रत्यक्ष कारवाई करून चार वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 
Top