भूम (प्रतिनिधी)- भगवान बिरसा मुंडा आदिवासी दिनानिमित्त पारधी समाजाच्यावतीने भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान ‘जय बिरसा मुंडा, जय आदिवासी समाज' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाला केवळ उपस्थिती लावून न थांबता नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी संपूर्ण वेळ पारधी समाजातील नागरिकांशी संवाद साधला. समाजातील नागरिकांच्या विविध अडचणी, समस्या आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेत त्यांनी त्यावर सविस्तर चर्चा केली. समाजबांधवांनी मांडलेल्या प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन करताना संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा संयोगिता गाढवे म्हणाल्या की, “पारधी समाजाच्या कोणत्याही अडचणीच्या काळात आपण समाजासोबत खंबीरपणे उभे राहू. समाजाला कधीही एकटे पडू देणार नाही. समाजाच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी जनसेवा आहे.”
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. पारधी समाजाच्या वतीने नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील नागरिक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
