धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिवच्या आरोग्य विभागाने आपल्या उल्लेखनीय कार्याची परंपरा कायम राखत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाआरोग्य सन्मान 2026' अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश लिंगराम हरिदास यांना राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आरोग्यविषयक कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनामध्ये सन 2025-26 या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. सतीश हरिदास यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामध्ये सन 2023-24 च्या आरोग्य निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक, सन 2024-25 च्या आरोग्य निर्देशांकामध्ये द्वितीय क्रमांक, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांक, सलग पाच वर्षे बालमृत्यूचे प्रमाण कमी राखणारा जिल्हा म्हणून प्रथम क्रमांक तसेच सन 2025 मध्ये राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांकाचा समावेश आहे.
