मुरूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचे “हरित धाराशिव अभियान 2.0“ अंतर्गत उमरगा तालुक्यातील विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना परिसरात भव्य आणि महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवघ्या बारा तासांत (सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत) तब्बल 1 लाख 50 हजार रोपांची लागवड करून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकण्यात आले आहे. ही विक्रमी मियावाकी घनवन लागवड गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली जाण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

विठ्ठलसाई साखर कारखाना परिसरातील एकूण 10 वेगवेगळ्या साईट्सवर, 5 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली. प्रति साईट 15, प्रमाणे एकूण 1,50,000 रोपांचे रोपण करण्यात आले. या मोहिमेत पर्यावरण संवर्धनाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तब्बल 50 प्रकारच्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, धाराशिव, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 14) रोजी हा उपक्रम पार पडला. 

या भव्य वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष  बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना समिती अध्यक्ष शरण पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह धाराशिव चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सहाय्यक वनसंरक्षक रोहिणी शिनगारे, लोहारा चे तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर, उमरगा चे तहसीलदार गोविंद येरमे, सहाय्यक गटविकास अधिकारी जगदेव वगे, विठ्ठल साई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसणे, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन शिंगणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी  वनस्पती तज्ञ डॉ. संजय बिराजदार, डॉ. दिगंबर चव्हाण, डॉ. राम बजगिरे,प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले,वनरक्षक गजानन दांडगे, अरुण चौघुले, सूर्यकांत माळी, विवेक गंगणे, वैभव पानसरे, विशाल धनके आदींनी पुढाकार घेतला. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध शासकीय विभाग, महाविद्यालये, शाळा आणि सामाजिक संस्थांनी मोठा पुढाकार घेतला.  श्री माधवराव पाटील महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसी (उमरगा), मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज, बी एस एस महाविद्यालय, माकणी येथील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

 संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट (दिल्ली - सोलापूर झोन, मुरूम ब्रँच) चे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार, प्रचारक चंद्रकांत चव्हाण, मुखी दयानंद साखरे, प्रा. डॉ. महेश मोटे, सुनील पिसके, हरिकिशन पवार, अमोल साबळे, सेवादल इन्चार्ज बिरु बंदीछोडे तसेच सेवादल महात्मे व बहिणजी श्रमदान करत वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. विठ्ठल साई कारखाना, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि कृषी विभाग, लोहारा यांच्या संयुक्त नियोजनामुळे हा महायज्ञ यशस्वीपणे पार पडला. वन विभाग, प्रशासन आणि नागरिकांच्या या अभूतपूर्व सहकार्यामुळे उमरगा तालुक्यात पर्यावरणपूरक संस्कृतीचा एक आदर्श पायंडा पडला असून, या विक्रमी उपक्रमाने संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

 
Top