धाराशिव (प्रतिनिधी)-  बदलत्या वैज्ञानिक परिस्थितीनुसार ग्रंथालयांनी आपल्या सेवा गतिमान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. मदनसिंग गोलवाल यांनी केले.  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ग्रंथालय विभागांतर्गत ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ शियाली रामामुर्त रंगनाथन यांची 134 जयंती वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

डॉ मदनसिंग गोलवाल म्हणाले की, आपण डॉ रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्राची पंचसूत्रीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आज पारंपरिक ग्रंथालयांचे रुपांतर डिजिटल ज्ञानकेंद्रांमध्ये होत आहे. आजचा ग्रंथपाल हा केवळ ग्रंथसंग्रहांचा संरक्षक न राहता ज्ञानमार्गदर्शक, माहिती साक्षरता प्रशिक्षक, संशोधन सहकारी आणि डिजिटल माहिती व्यावसायिक म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. 

अध्यक्षीय समापनामध्ये प्राचार्य डॉ मंजुळकर म्हणाले की, शिक्षणव्यवस्थेत ग्रंथालयाची भूमिका अधिक महत्वाची होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, संशोधन आणि ज्ञाननिर्मीती ची संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले.

 
Top