मुरूम(प्रतिनिधी)- राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि तरुणांमध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश देण्यासाठी शहरात गुरुवारी (ता. 13) रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली. राष्ट्रध्वजाजबद्दलचा अभिमान आणि देशप्रेमाची भावना मनात जागवत विद्यार्थी, माजी सैनिक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय मिळून जवळपास 6000 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
शहरात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित फेरीची सुरवात नगरपरिषद कार्यालयापासून करण्यात आली. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी, माजी सैनिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत फेरी महात्मा बसवेश्वर चौक येथे पोहोचली. राष्ट्रध्वजाला मानंवदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, श्रीराम नाडे, माजी सैनिक राजेंद्र बेंडकाळे, व्यंकट चौधरी, हनुमंत दुधगे, राजकुमार हिरेमठ, गुलाब अंबुसे, गटनेते गणेश अंबर, डॉ. सतीश शेळके, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, मुख्याध्यापिका
खतीब सय्यदा खुतेजा बेगम, अनुराधा जोशी, विजयकुमार देशमाने, दयानंद पाटील, राजशेखर कोरे, उपप्राचार्य उमाकांत महामुनी, सुभाष राठोड, सोनाली कलशेट्टी सर्व नगरसेवक यांच्यासह श्री माधवराव पाटील महाविद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक, जिल्हा परिषद मुलांची शाळा, नगर परिषद, विविध विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विविध संस्थांचे पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे मुरुम शहरात देशभक्तीचा आणि शिस्तीचा एकोपा दिसून आला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

