धाराशिव (प्रतिनिधी)- ‘हरित धाराशिव अभियान 2.0'च्या माध्यमातून 12 तासांत 10 लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.मात्र,हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.‘आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम ही झाडे जगविण्याचा करूया,'असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
धाराशिवजवळील शिंगोली येथे वन विभागाच्या जागेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी 14 ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव 2.0'अंतर्गत 10 लाख 9 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यानिमित्त शिंगोली येथील वन विभागाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड,विशेष अतिथी सिनेअभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, लेखक व साहित्यिक अरविंद जगताप आणि शिंगोलीच्या सरपंच योगिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. ‘हरित धाराशिव 2.0'साठी सहकार्य करणारे प्लॅनेटरा टीमचे चोले व त्यांचे सहकारी, सेरेंटिकाचे सुरजीत नारायण, प्रायमुव्हचे सिद्धार्थ विश्वकर्मा,स्टेट बँक ऑफ इंडियाचे पृथ्वीराज पाटील,जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे बसवराज दालगळे,टोरेंट ग्रीन एनर्जीचे विजय दलहाडे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे मिथिलेश पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘हरित धाराशिव 2.0'अंतर्गत 12 तासांत 10 लाख वृक्षलागवड पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विभागीय वन अधिकारी येडलावर यांनी मानले.
