धाराशिव (प्रतिनिधी)- मागील दोन महिन्यांपासून सांजा गावाला तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकरी, दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. पीक विमा, पीक पाहणी, महसूल अभिलेख तसेच शेतीविषयक विविध कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात अखेर प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले.

सांजा गावाला तातडीने तलाठी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने प्रशासनाला दिला होता. गावकऱ्यांच्या मूलभूत प्रशासकीय गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारण्यात आला.

दरम्यान, प्रहारच्या आंदोलनाचा दणका बसताच प्रशासनाला जाग आली. तहसीलदार मॅडम यांनी आंदोलनाची तातडीने दखल घेत सांजा गावासाठी तलाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेली महसूलविषयक कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रश्नासाठी सांजा येथील तरुण प्रशांत सूर्यवंशी यांनी फेसबुकच्या माध्यमातून आवाज उठवत सर्व संघटना व ग्रामस्थांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रहार संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आणि अखेर प्रशासनाला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटना, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर काकडे यांनी केले.

यावेळी सुरेश काशीद, इंग्रजीत मिसाळ, जमीर शेख, अशोक बीडभाग, बाबासाहेब गायकवाड, मनोज गायकवाड, दत्ता पवार, बाबा धावारे, मेहबूब तांबोळी, बालाजी तांबे, रणजीत वडणे, बालाजी राऊत, लक्ष्मण जाधव यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते.

शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला तर प्रशासनाला निर्णय घ्यावाच लागतो, हे सांजा येथील आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

 
Top