भूम (प्रतिनिधी)- भूम तहसील कार्यालय तसेच तांबेवाडी-माणकेश्वर येथील महसूल सेवक अरुण जाधवर यांच्या उत्कृष्ट महसूल सेवेसाठी परांडा येथे आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ‌‘उत्कृष्ट महसूल सेवक' म्हणून सन्मान करण्यात आला. धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. कीर्ती किरण पुजारा यांच्या हस्ते जाधवर यांचा सत्कार करण्यात आला.

महसूल विभागामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणे, महसूलविषयक कामकाजात नागरिकांना मार्गदर्शन करणे तसेच प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल सेवकांची भूमिका असते. या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अरुण जाधवर यांची ‌‘उत्कृष्ट महसूल सेवक' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

परांडा येथे झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा यांच्या हस्ते अरुण जाधवर यांना सन्मानपत्र व सत्कार करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रशासनाच्या वतीने मिळालेला हा सन्मान त्यांच्या सेवाभावी कार्याला मिळालेली पावती मानली जात आहे.

या कार्यक्रमास निवासी जिल्हाधिकारी कडवकर साहेब, भूमच्या उपजिल्हाधिकारी चव्हाण, भूमचे तहसीलदार जयवंतराव पाटील, नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्यासह महसूल विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अरुण जाधवर यांच्या या सन्मानामुळे भूम तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने शासकीय सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे.


भूम तालुक्याच्या महसूल विभागासाठी अभिमानाचा क्षण

भूम तहसील कार्यालय आणि तांबेवाडी-माणकेश्वर परिसरातील महसूलविषयक कामकाजात योगदान देणाऱ्या अरुण जाधवर यांना जिल्हास्तरावर मिळालेला हा सन्मान भूम तालुक्यासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. नागरिकांशी समन्वय ठेवून शासकीय कामकाज पार पाडणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.

 
Top