धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीज (बीएसएच) विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 'फ्रॉम स्कूल टू कॉलेज-अडॅप्टइंग, ग्रोइंग, सक्सीडिंग' या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी मिस धनिया मेनन या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्या नेपच्यून एक्सलन्सच्या सह-संस्थापिका, आयसीएफ प्रमाणित व्यावसायिक प्रशिक्षक (पीसीसी) , आंतरराष्ट्रीय एनएलपी मास्टर ट्रेनर तसेच मानव संसाधन (एचआर) क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञ आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले की,“प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात यशस्वीपणे समायोजित होण्यासाठी या कार्यक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होईल. आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, वेळ व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मिळालेले मार्गदर्शन त्यांच्या आगामी शैक्षणिक व करिअरच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य विकास करण्याची दिशा मिळते,“ असे त्यांनी नमूद केले.
ट्रेनर धनिया मेनन यांनी संवादात्मक शैलीत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, ध्येयनिर्धारण आणि वेळ व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अल्पकालीन व दीर्घकालीन ध्येये निश्चित करून त्यानुसार योग्य नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
भविष्यातील करिअरसाठी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर संवाद, सहकार्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि परस्परसंबंध कौशल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अपयशातून शिकून सातत्याने आत्मसुधारणा करण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमादरम्यान विविध संवादात्मक उपक्रम ( ऍक्टिव्हिटी ) घेण्यात आल्या, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक आणि करिअरविषयक शंकांचे समाधान करण्यात आले.
या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात सहज समायोजित होण्यास, आत्मविश्वास वाढविण्यास, योग्य ध्येये निश्चित करण्यास आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले, असे बीएसएच विभागप्रमुख डॉ. उषा वडणे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीएसएच विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि त्यांच्या आगामी कॉलेज जीवनाला नवी दिशा देणारे ठरले.
