तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात पुजाऱ्यांच्या घरी आलेल्या देवीभक्तांना माऊली आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे प्रेमाने वागवतात. स्वतःच्या हाताने भोजन बनवून भक्तांना खाऊ घालण्याची येथील परंपरा असल्याने पुजाऱ्यांच्या घरी आल्यानंतर भक्तांना आपल्या घरी आल्यासारखेच वाटते. असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार हभप. माऊली महाराज पठाडे (कर्जत) यांनी केले.
खटकाळ गल्ली येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवा देताना पठाडे महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचे महत्त्व सांगताना, आई तुळजाभवानी मातेने माँ जिजाऊंना आशीर्वाद दिला आणि शिवनेरीवर शिवबा राजे जन्माला आले. माँ जिजाऊंनी सामान्य घरातील मुलगाही राजा होऊ शकतो, हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. त्यातूनच स्वराज्याची निर्मिती झाली. असे सांगितले. आजच्या काळातील बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करताना त्यांनी सोळा वर्षांखालील मुले मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी गेल्याची चिंता व्यक्त केली. मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे असून, पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंबसंस्थेवर भाष्य करताना त्यांनी पती-पत्नीमधील वाढत्या मतभेदांवरही चिंता व्यक्त केली. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांमध्ये कुटुंब टिकवण्यासाठी संघर्ष करण्याची वृत्ती दिसते; मात्र आर्थिक संपन्नतेसोबत नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे, असे ते म्हणाले. तसेच विवाहासाठी केवळ पैसा न पाहता मुलाचे कर्तृत्व, निर्व्यसनीपणा आणि स्वभाव पाहावा, असा सल्ला त्यांनी मुलींच्या पालकांना दिला. यावेळी आयोजक किशोर कदम, नगरसेवक सुनील रोजकरी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
