भूम (प्रतिनिधी)- गाव करेल ते राव करू शकत नाही, ही म्हण प्रचलित आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये एक छोटे खेडे असणाऱ्या वंजारवाडी गावाने या म्हणीला छेद देत गाव एक कुटुंब अशी संकल्पना राबवून गावाचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. 'माझा वाढदिवस, माझी शाळा' असो की अखंड ज्ञानेश्वऱी पारायण सोहळा अशा उपक्रमातून गाव समृद्ध बनविणाच्या विडा गावातील गावकऱ्यांनी घेतला आहे.
तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले वंजारवाडी गाव काही वर्षांपूर्वी गुन्हेगारी आणि सतत भांडणतंटा असलेले गाव म्हणून प्रसिद्ध होते. पोलीस ठाण्यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या गावच्या असायच्या मात्र मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काळात आरसोली मध्यम प्रकल्प झाला. त्यानंतर या गावाचे रुपडे पालटून गेले. शेतीला पाणी मिळू लागले त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाचा मोबदला मिळू लागला. त्यातून शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन आपला उदरनिर्वाह करू लागली. शासकीय असो की निमशासकीय नोकरी करणारी मुले गावाकडे कुटुंब म्हूणन बघू लागली. जिल्हा परिषद शाळेला शासकीय निधीचा तुटवडा असला की गावातील नोकरदार पिढी उधार अंतकारणाने मदतीला पुढे येते. गावातील मंडळ अधिकारी या पदावर असणारे योगेश जगताप यांनी माझा वाढदिवस, माझी शाळा असा उपक्रम सुरु केला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
गावातील कोणाचाही वाढदिवस शाळेत साजरा करून चिमुकाल्याना भेट वस्तू देत साजरा केला जातो. तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा 36 व्या वर्षी हा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. या हरीनाम सप्ताहमध्ये गावातील एकाही घरची चूल पेटली नाही पाहिजे असा दंडक केला आहे. त्यामुळे गावातील अबालवृद्ध या सप्ताहामध्ये स्वतःला जोखून देऊन काम करत आहे. यासाठी निवृत्त प्राध्यापक प्रताप जगताप, उपसरपंच प्रभाकर डोंबाळे, संत गाडगेबाबा सामाजिक संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम डोंबाळे, पोलीस पाटील लक्ष्मीन तेलंगे यांच्यासह गावातील नागरिकांचा सहभाग आहे. शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी सप्ताह सुरु होणार असून, सांगता सोमवार दि. 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.