परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे परंडा येथे मंगळवार दि.18 रोजी आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमासाठी आले असता शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी त्यांना महाविद्यालयास भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.हे निमंत्रण स्वीकारून जिल्हाधिकारी पुजार यांनी सायंकाळी महाविद्यालयास भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची माहिती जाणून घेतली. धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे कार्य उल्लेखनीय असून, परंडा हे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तालुका असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची उत्तम सुविधा या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महाविद्यालयाचे प्रशस्त व सुंदर प्रांगण, विविध शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांचे त्यांनी कौतुक केले.अकरावी-बारावीपासून पदवी, पदव्युत्तर स्तरावरील कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, संशोधन केंद्र, पत्रकारिता आदी विविध अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना जिल्हाधिकारी पुजार यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.तसेच संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचेही त्यांनी कौतुक केले.“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारची महाविद्यालये प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे आहे,“असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव तसेच शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा शाल, पुष्पगुच्छ व महाविद्यालयाच्या इतिहासावर आधारित माजी प्राचार्य डॉ.दीपा सावळे लिखित पुस्तक भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव व महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
