धाराशिव (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील राष्ट्रीय प्रतिज्ञा' या अभियानांतर्गत जिल्हा परिषद धाराशिव येथे नशामुक्तीचा संकल्प करण्यात आला. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत समाजकल्याण विभाग आणि यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश काळे हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती समाजकल्याण सभापती मा. श्री. विश्वास कोकणे, अर्थ व बांधकाम सभापती मा. श्री. सिद्धेश्वर कोरे, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. तुकाराम भालके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. सचिन कवले, जिल्हा कृषी अधिकारी श्री. पाटील, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. रवींद्र खंदारे, यश मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. संदीप तांबारे तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समाजकल्याण सभापती श्री. विश्वास कोकणे यांनी नशामुक्ती अभियानाचे महत्त्व विषद करताना तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान होते, असे त्यांनी सांगितले. व्यसनामुळे कुटुंबातील नातेसंबंध बिघडतात, आरोग्य धोक्यात येते आणि समाजात अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपासून नशामुक्तीची सुरुवात करून समाजात जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अर्थ व बांधकाम सभापती श्री. सिद्धेश्वर कोरे यांनीदेखील व्यसनमुक्तीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. समाजातील विविध उदाहरणांचा संदर्भ देत त्यांनी व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. युवकांनी चुकीच्या सवयींपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिक्षण आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सर्व कार्यालये आणि संस्थांच्या परिसरात गुटखा, तंबाखू किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या या अभियानाला प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांनी केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट आणि विविध धोरणांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आपला जीव धाराशिव' या अभिनव उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. विशेषतः विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘दररोज दोन तास मोबाईल बंद' या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू, गुटखा आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्यासाठी हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यश मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख डॉ. संदीप तांबारे यांनी आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. नशामुक्त समाज कसा घडविता येईल, याबाबत त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांनी व्यसनाधीनतेची सुरुवातीची लक्षणे ओळखणे, मित्रपरिवाराचा दबाव, ताण-तणाव आणि मानसिक अस्थिरता यामुळे व्यसनाकडे वळणाऱ्या व्यक्तींना योग्य वेळी समुपदेशनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. व्यसनमुक्तीसाठी कुटुंबाचा सक्रिय सहभाग, सकारात्मक वातावरण, योग, व्यायाम, क्रीडा व आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच व्यसनमुक्ती केंद्रे, हेल्पलाईन सेवा आणि गोपनीय समुपदेशन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा सांगत त्यांनी पुनर्वसन प्रक्रियेत सातत्य आणि आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हेही अधोरेखित केले. यश मेडिकल फाउंडेशन तळागाळातील लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचे काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच समाजकल्याण विभागाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात नशामुक्त अभियान सुरळीतपणे व सक्षमपणे राबविण्यासाठी जनतेने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. या अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन व्यसनमुक्त समाजनिर्मितीस हातभार लावावा, असेही स्पष्ट करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी मदत व मार्गदर्शनासाठी नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक 14446 वर संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. रवींद्र खंदारे यांनी तंबाखूमुक्ती, गुटखामुक्ती आणि व्यसनमुक्त शालेय वातावरण निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच योग्य सवयी रुजविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, शिक्षक आणि पालक यांनी एकत्रितपणे व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी सर्वांचे आभारही मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री. जंगम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी नशामुक्तीची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत माहिती व प्रसिद्धी कक्षाने विशेष परिश्रम घेतले.
