धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभाग समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबतच्या मागण्या मांडल्या. 2027 अखेर पर्यंत धाराशिव-तुळजापुर-सोलापूर रेल्वे मार्ग पुर्ण करा अशी मागणीही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेऊन प्रकल्पाला गती देण्यात यावी.धाराशिव-संभाजीनगर रेल्वेमार्गाची सद्यस्थिती स्पष्ट करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यात यावी. लातूर-औसा-उमरगा-कलबुर्गी नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देण्यात यावी. शेगाव-पंढरपूर नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देऊन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यात यावा. बार्शी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्यात यावा. लातूर-मुंबई रेल्वेगाडीला कळंब रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. पनवेल-नांदेड एक्सप्रेसला ढोकी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी. लातूर रेल्वे पिट लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सांगली-परळी डेमू (क्र. 110411) अकोलापर्यंत विस्तारित करण्यात यावी. लातूर-धाराशिव-बार्शी मार्गावरील आरक्षित कोटा वाढविण्यात यावा. लातूर-मुंबई रेल्वेगाडीला 5 नवीन जनरल डबे जोडण्यात यावेत, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तेर येथील संत गोरोबा काका मंदिराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन तेर येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात यावे तसेच रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
धाराशिव लोकसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील रेल्वे सुविधांचा विस्तार, नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी, प्रलंबित प्रकल्पांना गती तसेच प्रवाशांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत झाली तरच मराठवाड्याच्या विकासाला अधिक वेग मिळेल. त्यामुळे बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
