धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती, धाराशिव संचलित धाराशिव प्रशाला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार रणदिवे हे होते. सुवर्णा सोनवणे, सारिका सोनटक्के आणि ज्ञानदेव जोंधळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. बालाजी मसलगे यांनी प्रस्ताविकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंची माहिती दिली. यावेळी 'फकिरा' आणि 'माझी मैना गावाकडं राहिली' यांसारख्या साहित्यकृतींमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या वेदनांना शब्दबद्ध करत समाजप्रबोधनाचे महान कार्य उभे केले, यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली आणि जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांची परंपरा सुरू केली, याचाही उल्लेख करण्यात आला.
ज्ञानदेव जोंधळे यांनी या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना समाजप्रबोधन, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये या दोन्ही महापुरुषांनी बजावलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. तर सारिका सोनटक्के यांनी आपल्या मनोगतातून या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय समारोपात नंदकुमार रणदिवे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांमधून समाजात जागृती निर्माण करण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन दिपाली रोकडे यांनी केले. या प्रसंगी गौरी माने, सुधीर पवार, पांडुरंग देशमुख यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
