धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने दिनांक २७ व २८ जून रोजी इरा इंटरनॅशनल स्कूल, सांजा रोड, धाराशिव येथे दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अभ्यासवर्गात जिल्हाभरातून एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ३२ विद्यार्थी,९ विद्यार्थिनी, ४ प्राध्यापकाचा समावेश होता.
या अभ्यासवर्गातील स्व. प्रा. यशवंतराव केळकर प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन समता माध्यमिक सेवाभावी शिक्षण संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. उषा वडने, शहर उपाध्यक्ष प्रा. पूजा मुंढे पाटील व शहर सहमंत्री जयराज शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. संपूर्ण अभ्यासवर्गाला अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. सारंग जोशी,प्रदेश सहसंघटन मंत्री श्री. शुभम स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी कार्यकर्त्यांना अभाविपचे कार्य, विचार, संघटन पद्धती, विद्यार्थी हिताचे प्रश्न तसेच राष्ट्रनिर्माणातील विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या या अभ्यासवर्गामध्ये कार्यकर्त्यांनी अभाविपची विचारधारा, कार्यपद्धती आणि विद्यार्थी चळवळीचे महत्त्व यांचा सखोल अभ्यास केला. तसेच राष्ट्रसेवा, समाजकार्य आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी केला. उत्साह, शिस्त आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा जिल्हा अभ्यासवर्ग दिनांक २८ जून रोजी आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
