मुरूम (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुरूम सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत वर्ष 2025-26 मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत, क्लबला तब्बल तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

लातूर येथे पार पडलेल्या विशेष रोटरी पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब मुरूम सिटीला ‌‘क्लब एक्सलन्स अवॉर्ड', ‌‘डिजिसायटेशन अवॉर्ड' आणि ‌‘बेस्ट अचिव्हमेंट इन पब्लिक इमेज' या तीन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लब मुरूम सिटीने केवळ उपक्रमांचे आयोजन न करता समाजातील तळागाळातील गरजू घटकांपर्यंत थेट मदत पोहोचविण्यावर भर दिला. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सायकलींचे वाटप, शालेय स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रम. गरजू व विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप आणि महिलांच्या कलागुणांना हसरे व्यासपीठ, आरोग्यविषयक शिबिरे, डॉक्टरांचा विशेष सन्मान आणि व्यापक वृक्षारोपण मोहीम, ज्येष्ठ नागरिकांसोबत विविध सण साजरे करणे व सामाजिक जाणिवा जोपासणारे उपक्रम.

लातूर येथील या दिमाखदार सोहळ्यास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे, डॉ. दीपक पोकळे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी आणि सचिव कल्लाप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या लोकउपयोगी कामांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. क्लबच्या वतीने अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, सुनील राठोड, संतोष कांबळे, बाबासाहेब पाटील आणि डॉ. कमलाकर मोटे यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले. या यशाबद्दल रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

 
Top