धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यास तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील तब्बल 898 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 273 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 35 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. पुणे, मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव येथील विविध कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक आयुक्त संजय गुरव, सहाय्यक संचालक (अल्पसंख्याक व बहुजन कल्याण) अमोल ताकभाते, जिल्हा रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष महेश वडगावकर, जिल्हा मेळावा समितीचे संयोजक सुशांत सोनवणे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप तसेच महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी महेश वडगावकर, अमोल ताकभाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्च 2025 पासून हा तिसरा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. आपल्या परिसरातील जवळपास हजारो नोकरीच्या संधी यातून उपलब्ध झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महाविद्यालयाकडून सातत्याने घडविले जाणारे कुशल विद्यार्थी यामुळे विविध कंपन्यांकडून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर निवड होत आहे. ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या संपूर्ण टीमसह ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप, प्रा. संदीप टेकाळे, डॉ. गुरुप्रसाद चिवटे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. आर. ए. दंडनाईक, प्रा. आर. एस. सरवदे, आर. एल. मुंडे, एस. एन. नेपते, रणजीत जराड तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

