परंडा (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‌‘आजचा युवक आणि महापुरुषांचे विचार आजच्या काळाशी समन्वय' या विषयावर व्याख्यान व एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मोरे, समुपदेशक मकरंद वांबुरकर आणि टेक्निशियन अजय वैद्य उपस्थित होते. व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक तोडकरी आणि प्राध्यापक जगन्नाथ माळी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.आनंद मोरे यांनी आजच्या युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, युवक हे देशाचे वर्तमान आणि भविष्य असून, महापुरुषांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादाच्या विचारांना आधुनिक काळाच्या गरजांशी जोडणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून युवकांनी प्रेरणा घेऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारावी. शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, डिजिटल माध्यमांचा विवेकी वापर आणि सामाजिक सलोखा या क्षेत्रांत युवकांनी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. एड्स जनजागृतीविषयी मार्गदर्शन करताना समुपदेशक मकरंद वांबुरकर यांनी एचआयव्ही/एड्सविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली. एचआयव्ही संसर्ग कसा होतो आणि कोणत्या मार्गाने होत नाही, याबाबत विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती देत त्यांनी सुरक्षित व जबाबदार जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांच्याशी माणुसकीने वागणे आवश्यक आहे. योग्य माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर तपासणी आणि समुपदेशन यामुळे एड्सविषयी जनजागृती प्रभावीपणे करता येते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. महेश कुमार माने यांनी युवकांनी केवळ करिअरकडे लक्ष न देता सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांचा अभ्यास करून त्यातील मूल्ये प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास डॉ.सचिन चव्हाण, डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. विद्याधर नलवडे, प्राध्यापक प्रकाश मिसाळ यांच्यासह कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.

 
Top