धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला आणि वाणिज्य शाखेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जागतिक युवा दिनाचे औचित्यसाधून 'मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळा'चा स्थापना आणि उद्घाटन सोहळा दि. 12 ऑगस्ट रोजी जुन्या इमारतीमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण करणे आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, या उदात्त हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी कार्यक्रमास उद्घाटक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे, के.पी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या आगमनाने व स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच ज्ञानेश्वरी आणि अभंगगाथेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व मंडळाचे समन्वयक प्रा. डॉ. मनोज डोलारे यांनी केले. त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण आणि संवेदनशील प्रास्ताविकातून मराठी भाषेची थोरवी, संत व साहित्यिकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखनाची गोडी निर्माण करण्यासाठी या मंडळाची आवश्यकता यावर सविस्तर प्रकाश टाकला. या मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर सानिया शेख या विद्यार्थीनीने मंडळाच्या नवीन विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात केली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री आदित्य भैय्या पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून मंडळाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले, तसेच त्यांच्याच हस्ते मंडळाच्या 'कार्यकारिणी फलकाचे' दिमाखदार अनावरणही संपन्न झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंडळाची पुस्तिका, पेन, गुलाबपुष्प देवून नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सानिया फुलारी आणि अविराज आंबेवाडीकर यांनी आपल्या मनोगतातून वर्षभर मंडळाच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम आणि स्पर्धा यशस्वीपणे राबवण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना कला व वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. श्री कैलास कोरके यांनी विद्यार्थ्यांना साहित्याचे जीवनातील महत्त्व समजावून सांगत अवांतर वाचनाचा सल्ला दिला. विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्री संतोष घार्गे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रमाण लेखनाचे महत्त्व पटवून देत मंडळाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री नंदकुमार नन्नवरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. “केवळ परीक्षार्थी न बनता विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच साहित्याशी नाळ जोडली पाहिजे,“ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि नवनियुक्त कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी भरघोस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना मा. श्री आदित्य भैया पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगून साहित्याच्या क्षेत्रात नवनिर्मिती करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाच्या आणि स्पर्धेच्या युगात मातृभाषेचे संवर्धन ही काळाची गरज असून, या मंडळाच्या माध्यमातून नक्कीच उद्याचे उत्तम साहित्यिक आणि वक्ते घडतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळात अश्विनी शेळके (अध्यक्षा), कशिश शेख (कार्याध्यक्ष), कृष्णा चौरे (उपाध्यक्ष), मिनाक्षी पाठक (सचिव), सानिया फुलारी (कार्यक्रम समन्वयक), शुभम पवळे (सहसचिव), सानिया जलील शेख (विद्यार्थी संपादक), मोनिका ढाले (खजिनदार), अविनाश भिंगडे (प्रसिद्धी प्रमुख), वेदिका आघाव (कार्यक्रम सहसमन्वयक), अर्शद तांबोळी (सह प्रसिद्धी प्रमुख), पद्मजा वाघमोडे (संकलन प्रमुख), राजेश्वरी घोडके (कला व सजावट प्रमुख), अमृता मेंढे (वक्तृत्व व वादविवाद प्रमुख), जान्हवी अलकुंटे (ललित साहित्य प्रमुख), कल्याणी क्षीरसागर (वाचन प्रेरणा प्रमुख), अविराज आंबेवाडीकर (तंत्रज्ञान प्रमुख), धनश्री गाडे (भाषिक खेळ प्रमुख), गौरव भोसले (काव्य कट्टा प्रमुख), सायली टाकणखार (नाट्य विभाग प्रमुख) यांची सार्थ निवड करण्यात आली.
या शानदार सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन कशिश शेख आणि पद्मजा वाघमोडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मंडळाची नवनियुक्त अध्यक्षा अश्विनी शेळके हिने केले. पसायदानाच्या गायनाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डी.वाय घोडके, प्रा.राज भोसले, प्रा.यशवंत कोकाटे, दत्ता दाणे यांनी परिश्रम घेतले. या उद्घाटन समारंभाला समस्त मराठी विभाग, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुळाताई पाटील यांचे सहकार्य लाभले.
