धाराशिव (प्रतिनिधी)- आस बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक जयंती सोहळा पिपल्स कॉलेज धाराशिव अभिवन इंग्लिश स्कूलच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूस, भानु नगर, धाराशिव येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमात वामनदादा कर्डक याच्या प्रतिमेस प्रा. डॉ. रवि सुरवसे कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद समुद्रे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, व्याख्याते प्रा. महेंद्र चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमा निमित्त आंबेडकरी चळवळीत वामनदादाचे योगदान या विषयावर व वामनदादा कर्डक यांच्या कवितांचे अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त कृषी अधिकारी आनंद समुद्रे यांचे सुनिलभाऊ बनसोडे यांनी पुष्पहार, शाल देवून स्वागत केले. व्याख्याते प्रा. महेंद्र चंदनशिवे यांचे स्वागत दिलीप वाघमारे, मारुती पवार यांनी शाल व पुष्पहार देवून केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. रवि सुरवसे यांनी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमात सांची कळासरे हिने पाणी वाढं गं माय, आगं लई नाही मागत, त्रिशाला ठांणाबीर यांनी तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, पंडीत कांबळे यांनी सांगा, बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठ हाय हो, व्ही.एस. गायकवाड यांनी भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते, मनिषा ताकपिरे यांनी चंदनाची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भिमराया , प्रभाकर बनसोडे यांनी केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. दिपक बनसोडे यांनी अरे सागरा भिम माझा येथे निजला शांत हो जरा, शाम बनसोडे यांनी दारी पिंपळ पानाचा पार आहे, लिना कांबळे यांनी आई तुझा मी नंदन आहे. पाई तुझ्या हे वंदन आहे, शामल ताकपिरे यांनी, भिकारी होवून दारी तुझ्या मी दान मागावे, शोभ चंदनशिवे यांनी उध्दारीली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे हे गीत सादर केले.
आंबेडकरी चळवळीत वामनदादाचे योगदान या विषयावर प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनी वामनदादांनी सात दशके आंबेडकरी विचारांचा गायनातून प्रचार केला आहे. वामनदादा डॉ. आंबेडकरांच्या सभेपूर्वी गायन सादर करत असायचे. त्यांनी 10000/- गीते लिहिले आहेत. त्यांनी आपली शाहिरी, कविता प्रबोधनासाठी वापरली. वामनदादा हे आंबेडकरी विचारांचे भाष्यकार आहेत त्यांनी आपल्या गितातून मानव मुक्तीचा विचार मांडला. लोकगितातून लोकजागृती केली अध्यक्षीय समारोप करताना आनंद समुद्रे यांनी वामनदादा विषयी माहिती सांगून सांगिताच्या तालावर पुसे रोज वामनास वामनची माय तुझ्या हाती तुप आलं तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गडया समाजाचं काय, हे गीत गाऊन कार्यक्रमात बहार आणली. कार्यक्रमासाठी प्रा. अंबादास कळासरे, अमोल गडबडे, विकास काकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागनाथ गोरसे, दिलीप वाघमारे, मारुती पवार, टी.एन. काझी, नितीन माने, प्रा. राम चंदनशिवे इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रंसचालन राजेंद्र अंगरखे यांनी केले, शामल ताकपिरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
