धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्र विकासासह समाजाच्या जडणघडणीत साहित्यिक आणि कलावंतांचे योगदान अनन्यसाधारण असून, त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, विचारांना समृद्धी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते. शांतीचे व क्रांतीचे वारसदार घडविण्याची ताकद साहित्य आणि कलेत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या युगात झपाट्याने कमी होत चाललेली वाचनसंस्कृती जपणे, तिचे संवर्धन करणे आणि दर्जेदार साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती, देवगिरी प्रांत साहित्य भारती जिल्हा शाखा, धाराशिव यांच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव येथे 'राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान समारंभ'जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य प्रा डॉ . नरेंद्र पाठक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांत संघटन मंत्री युवराज नळे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, साहित्य भारतीचे सल्लागार डॉ. अभय शहापूरकर, प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, युवराज नळे यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारांतर्गत पद्य, गद्य आणि संस्था या विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. स्नेहल कुलकर्णी, धर्मवीर पाटील, प्रकाश गव्हाणे व उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय संस्था गौरव पुरस्कार खंडू राऊत आदी साहित्यिकांना राज्य साहित्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत विशारद परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संगीत विशारद व युवा गायिका शर्वरी डोंगरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुनीता गुंजाळ व समाधान शिकेतोड यांनी केले.तर मानपत्राचे वाचन हनुमंत पडवळ यांनी केले.
