धाराशिव (प्रतिनिधी)-  केशेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन 2025-26 या आर्थीक वर्षाची 29 वी अधिमंडळाची वार्षीक बैठक कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि.30 ऑगस्ट रोजी कारखाना साईट, अरविंनदनगर येथे उत्साहात संपन्न झाली.

कारखाना कामकाजास सुरुवात करणेपूर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत गोरे यांनी केले. तद्नंतर द शुगर टेक्नॉलॉजीस्ट्स असोशिएशन ऑफ इंडिया संस्थेने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केल्याबद्दल त्यांचा आंबेडकर परिवाराच्या वतीने हरिदास कळसुले व आगतराव लोमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर अरविंद गोरे यांच्या हस्ते कारखाना कार्यक्षेत्रातील सात सर्कलमधील अहवाल सालात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच कार्यकारी संचालक एस.पी. डाके यांनी अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रध्दाजंली वाहुन विषय सुचीचे वाचन केले. त्यानंतर बैठकीसमोर मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मान्यता दिली.

यावेळी अरविंद गोरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना सांगीतले की, आजपर्यंत आपल्या सर्वांच्या पाठबळावर हा कारखाना सुरू आहे. मागील वर्षी आपल्याला सरासरी टनेज कमी आले, त्यामुळे ऊसा अभावी कारखाना लवकर बंद करावा लागला. यावर्षी पण पाऊस कमी आहे. ऊसाची वाढ न झाल्यामुळे टनेज कमी येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे परतीचा पाऊस कसा होईल यावर सर्व अवलंबून आहे. काहीवेळा पाण्याअभावी आपण ऊसाच्या पाण्यावर कारखाना चालविला. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री विलास ऊर्फ हनुमंत भुसारे यांनी सभा संपलेचे जाहीर करुन उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.

 
Top