उमरगा (प्रतिनिधी)- येथील बहुजन हिताय वसतीगृह आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठ वर्षांपासून सर्पसंवर्धन व जनजागृतीचे कार्य करणारे सर्पमित्र संजूबाबा कवठेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बहुजन हिताय वसतीगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 101 वेळा रक्तदान करणारे शेखरभाऊ आंबेकर होते. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती रुक्मिणीताई देविदास कांबळे, निवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश बिराजदार, उद्योजक कुमार कांबळे, दगडू सगर, आदर्श शिक्षिका सुजाता घोडके, वसतीगृहाचे संचालक वगरसेन कांबळे, अधीक्षक प्रज्ञाजीत तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमीत कोथिंबीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजूबाबा कवठेकर यांनी धाराशिव व लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून सापांविषयी जनजागृती केली आहे. परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता सुरक्षित अंतरावरून लक्ष ठेवावे आणि सर्पमित्राशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यातून त्यांनी आतापर्यंत सुमारे चार हजार सर्पांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले. तसेच सर्पदंशाच्या धोक्यापासून अनेक नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ व मानवतावादी कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना संजूबाबा यांनी सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या प्रमुख विषारी सापांच्या जाती असून इतर अनेक साप बिनविषारी असतात, असे त्यांनी सांगितले. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे. अँटी-स्नेक व्हेनम हे सर्पदंशावरील महत्त्वाचे उपचार उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास त्याला मारू नये. नागरिकांनी तातडीने 7385076741 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संजूबाबा यांनी केले. तसेच त्यांच्या ‌‘संजूबाबा सर्पमित्र' या यूट्यूब चॅनेलला फॉलो करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने बहुजन हिताय वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साहित्य, माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य, तर ग्राम ऊर्जा संस्था, तुगाव यांच्या वतीने सॅनिटरी साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत कोथिंबीरे यांनी केले. प्रास्ताविक प्रज्ञाजीत यांनी केले.  तर आभार प्रदर्शन कमलाकर सुरवसे यांनी मानले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top