धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणच्या धाराशिव मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता संजय श्रावण आडे यांना कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरील आढाव्यात कामगिरी समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.
वीजहानीचे वाढते प्रमाण, स्मार्ट मीटरधारक ग्राहकांच्या वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरच्या पडताळणीत झालेली दिरंगाई, वीज चोरी पकडण्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यल्प कारवाई तसेच आढळून आलेल्या अनधिकृत वीज वापराच्या प्रकरणांमध्ये दंडात्मक व फौजदारी कारवाई न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परवाच छत्रपती संभाजीनगरचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र.) तथा सक्षम अधिकारी धनंजय औंढेकर यांनी निलंबन आदेश जारी केला आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दि. 27 एप्रिल, 5 मे, 12 मे, 24 जून, 16 जुलै, 18 जुलै, 22 जुलै, 29 जुलै, 3 ऑगस्ट, 6 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधून विविध कामगिरी सुधारण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश दिले होते. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल न भरल्यामुळे स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची 100 टक्के पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. वीजपुरवठा खंडित असताना संबंधित ग्राहकांकडून अनधिकृतपणे वीज वापर अथवा वीज चोरी होत नाही, याची खात्री करणे तसेच थकीत वीज बिलांची वसुली वाढविणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मात्र, दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीत धाराशिव मंडळाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले.
धाराशिव मंडळात एकूण 17,398 ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटोमॅटिक पद्धतीने खंडित झाल्यानंतर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आदेशात नमूद आहे. तर 10,569 ग्राहकांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप सुमारे 39.2 टक्के ग्राहकांची पडताळणी बाकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वीजहानीत मोठी वाढ
2025-26 : लघुदाब वाहिनीवरील वितरण व AT&C वीजहानी 19.78 टक्के, 2026-27 पहिली तिमाही : वीजहानी 30.37 टक्के म्हणजेच मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वीजहानीत लक्षणीय वाढ झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
2,400 वीज चोरी पकडण्याचे उद्दिष्ट; प्रत्यक्षात 399च प्रकरणे
धाराशिव मंडळाला 2,400 वीज चोरीची प्रकरणे पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, एप्रिल ते जुलै 2026 या चार महिन्यांत केवळ 359 वीज चोरीची प्रकरणे पकडण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये आणखी केवळ 40 प्रकरणे पकडण्यात आल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एकूण 399 वीज चोरीची प्रकरणे पकडण्यात आली. दिलेल्या 2,400 प्रकरणांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प असल्याचे कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे.
विशेष म्हणजे, पकडलेल्या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये अद्याप दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा ठपकाही आदेशात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
1,150 ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर
स्मार्ट मीटर ग्राहकांच्या पडताळणीदरम्यान 1,150 ग्राहक अनधिकृतपणे वीज वापरत अथवा वीज चोरी करत असल्याचे आढळले. यापैकी 58 ग्राहकांवर भारतीय वीज कायदा 2003 मधील कलम 135 अंतर्गत कारवाई, 3 ग्राहकांवर कलम 126 अंतर्गत कारवाई झाली. मात्र एकाही प्रकरणात एफआयआर दाखल केली नसल्याचे आदेशात नमूद आहे.
पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघाडाचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले
धाराशिव मंडळाच्या कार्यक्षेत्रात आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 4 पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते. तर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एप्रिल 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत 6 पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले. मागील वर्षाच्या तुलनेत पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले असल्याचे आदेशात नमूद आहे.
34,216 थकबाकीदार ग्राहकांपैकी 20,796 जणांचा वीजपुरवठा सुरूच
धाराशिव मंडळातील 34,216 थकबाकी असलेल्या ग्राहकांपैकी केवळ 10,321 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तब्बल 20,796 ग्राहकांनी थकबाकी न भरताही वीजपुरवठा सुरू ठेवला त्यामुळेही कारवाई करण्यात आली. निलंबन काळात संजय आडे यांना दर सोमवार आणि शुक्रवार या कार्यालयीन दिवशी सकाळी 10 वाजता मुख्य अभियंता, परिमंडळ कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे हजेरी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.