धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या लढ्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून तब्बल 5 हजार रिक्षा आणि ट्रॅक्टरचा ताफा अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून तो आपल्या हक्काच्या भविष्यासाठीचा संघर्ष असल्याची भावना आंदोलकांमध्ये दिसून आली. याच भावनेतून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रिक्षा, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांमधून हजारो नागरिक अंतरवालीच्या दिशेने निज्ञाले. जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे सात है, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

धाराशिवसह कळंब, तुळजापूर, उमरगा, भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यातून मराठा समाजातील नागरिक वाहनांसह एकत्र येवू लागले. रिक्षा आणि ट्रॅक्टरवर भगवे झेंडे फडकत होते. अनेक वाहनांवर मराठा आरक्षणाच्या मागणीचे फलक लावण्यात आले होते. तरूणांचा उत्साह, जेष्ठांचा निर्धार आणि महिलांचा सहभाग यामुळे आंदोलनाला व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले. 

 
Top