धाराशिव (प्रतिनिधी)- अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले. क्रांतिसूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. “पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही समाजाला संघर्षाची आणि परिवर्तनाची प्रेरणा देतो. सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय व समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,मिलिंद आप्पा पेठे, नगरसेवक पंकज भोसले, नगरसेवक सुनील आंबेकर, नगरसेवक सर्फराज कुरेशी, योगेश सोन्ने पाटील, रवी ठेंगल, बाळासाहेब कसबे, ज्योतीताई माळाळे, सुशांत बनसोडे, सुरज वडवले, शुभम सुकाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
