धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे आंबेवाडी (ता. जि. धाराशिव) येथील गट क्रमांक 309 मधील वन विभागाच्या ताब्यात असलेल्या सुमारे 65 एकर वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बाहेरील गावातील काही व्यक्तींनी या वनजमिनीतील झाडांची बेकायदेशीर कत्तल करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोडीनंतर सदर ठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
शासकीय वनजमिनीवर अशा प्रकारे उघडपणे वृक्षतोड आणि अतिक्रमण होत असेल तर वन विभाग आणि महसूल प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शासकीय वनजमिनीची सुरक्षा कोणाच्या जबाबदारीत आहे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रात वृक्षतोड कशी घडली, याची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वनजमिनीवरील वृक्षतोडीचा पंचनामा करावा, किती झाडे तोडली, कोणत्या कालावधीत तोड झाली, तोडलेल्या लाकडाची विल्हेवाट कुठे लावली आणि अतिक्रमणामागे नेमके कोण आहेत, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
एकीकडे बाहेरील व्यक्तींकडून वनजमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे आंबेवाडीतील अनेक स्थानिक भूमिहीन अनुसूचित जातीतील कुटुंबे आजही जमीन, घरकुल आणि उपजीविकेच्या साधनांपासून वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बाहेरील व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावण्याऐवजी शासनाने लागू नियमांनुसार पात्रता तपासून स्थानिक भूमिहीन व गरजू कुटुंबांना प्राधान्याने जमीन वाटप करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वनजमिनीचे संरक्षण करावे, वृक्षतोडीची नोंद घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पात्र स्थानिक भूमिहीन कुटुंबांच्या हक्कासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही व घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर राजाभाऊ राऊत, प्रमोद राऊत, दादासाहेब राऊत, आबा राऊत, सुनील राऊत, ज्ञानेश्वर कांबळे, सागर कांबळे, मारुती राऊत, अभिमान राऊत, सुनीता हुंडे, वच्छला राऊत यांच्यासह 21 हून अधिक भूमिहीन मागासवर्गीय नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
