परंडा (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सह अधीक्षक पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे, डॉ.आकाश जाधवर, डॉ. आनंद मोरे, आरोग्य सहाय्यक अनिल भोसले, सुर्वेकर सिस्टर तसेच कल्याण जोशी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजपरिवर्तनाच्या कार्याचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची संधी मर्यादित असतानाही त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर साहित्य, लोककला आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांच्या लेखणीतून समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि मानवी मूल्यांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या काळात अधिकच महत्त्वाचे ठरतात. समाजात वाढत चाललेली जातीय तेढ, सामाजिक विषमता, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, महिलांवरील अत्याचार, शिक्षणातील असमानता आणि सामाजिक माध्यमांतून पसरवला जाणारा द्वेष यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांच्या मानवतावादी आणि समतेच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने जात,धर्म, पंथ आणि भाषा यापलीकडे जाऊन माणुसकी, परस्पर सन्मान आणि संविधानिक मूल्ये जोपासली, तर अधिक सुसंवादी आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकते. आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकानेही अण्णाभाऊ साठे यांच्या सेवाभावी आणि समतावादी विचारांचा आदर्श घेत प्रत्येक रुग्णाला समानतेने, संवेदनशीलतेने आणि मानवतेच्या भावनेतून सेवा देणे, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
