धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय रुजविणे, वाढता स्क्रीन टाईम कमी करणे आणि कुटुंबातील संवाद अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या 'संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही-मोबाईल बंद' या अभिनव उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये दररोज संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायतीचा भोंगा वाजताच अभ्यासासाठी दोन तासांचे वातावरण निर्माण होत असून, अनेक गावांमध्ये हा उपक्रम आता लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते, भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता. 'आपला जीव धाराशिव व्हिजन 2030' या व्यापक संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील जिल्हा परिषदांच्या कामकाजात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे. उपक्रमानुसार दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईलचा वापर टाळून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केले आहे. या कालावधीत शासकीय कर्मचारी गावांमध्ये जनजागृती करत उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करत आहेत.
विशेष म्हणजे, अनेक गावांतील पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून ते स्वतःही मुलांसमवेत मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाचे वातावरण तयार करत आहेत. काही गावांमध्ये कुटुंबांनी 'मोबाईलमुक्त दोन तास' या संकल्पनेला प्रतिसाद देत सेल्फी, प्रेरणादायी संदेश आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक सहभाग आणि कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारी चळवळ बनत आहे.
वाढत्या डिजिटल व्यसनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून समाजाने एकत्र येत उचललेले हे पाऊल राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, धाराशिवचा हा प्रयोग इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी मॉडेल ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डिजिटल साधने आवश्यक असली तरी त्यांचा संयमी वापर आणि शिक्षणाला प्राधान्य हा संदेश देणारा धाराशिवचा हा प्रयोग आता राज्यभर चर्चेत आहे. मुलांच्या भवितव्यासाठी दोन तास स्क्रीनपासून दूर राहण्याचा हा साधा पण परिणामकारक संकल्प शिक्षणासोबतच संस्कार, संवाद आणि सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दाखवत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
