तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे आजोळ असलेल्या आणि सध्या पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या श्रेया मिलिंद दंडे हिने मलेशियात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत दमदार कामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. श्रेयाने स्टिक फाईट प्रकारात सुवर्णपदक, तर काठी फिरवण्याच्या प्रकारात कांस्यपदक पटकावले.
मलेशियात झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुमारे 12 देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्टिक फाईट हा प्रकार प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये खेळला जातो. या प्रकारात महाराष्ट्राच्या श्रेयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविल्याने तिच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. श्रेयाचा हा यशस्वी प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झाला आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही श्रेयाने आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. मलेशियातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवाराने आर्थिक मदतीचा हात दिला. या यशासाठी श्रेयाला संजय बनसोडे, स्मिता धिवर तसेच तिची आई सीमा मिलिंद दंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पाठबळामुळे श्रेयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.