धाराशिव प्रतिनिधी)- पंढरपूर-शेगाव या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या मागणीला बळकटी देण्यासाठी पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे भवन येथे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंढरपूर-शेगाव रेल्वे मार्गामुळे पंढरपूर, भूम, परंडा, वाशी तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थेट रेल्वे संपर्काचा मोठा लाभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी पुढील काळात सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार विशाल पाटील तसेच मेघा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह भूम, परंडा, वाशी परिसरातील गोरख भोरे, तानाजी पाटील, बागल, संकेत बागल, संतोष वरळे तसेच इतर मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर-शेगाव रेल्वे मार्ग हा केवळ प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा प्रकल्प नसून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा दुवा ठरण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे शेतमालाची बाजारपेठांपर्यंत वाहतूक, उद्योग-व्यवसायांना चालना, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि धार्मिक स्थळांशी संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या माध्यमातून पाठपुरावा अधिक तीव्र करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
