धाराशिव (प्रतिनिधी)- व्यसनाच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला योग्य वेळी दिशा मिळाली,तर तिची ऊर्जा समाजघडणीसाठी उपयोगात येऊ शकते.याच भावनेतून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‌‘नशामुक्त धाराशिव' अभियानाला युवक,विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण आणि नशामुक्तीची सामूहिक शपथ यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद धाराशिव आणि यश मेडिकल फाऊंडेशन संचलित येडाई व्यसनमुक्ती केंद्र,येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 18 ऑगस्ट रोजी जिल्हाभर विशेष नशामुक्ती अभियान राबविण्यात आले.

या अभियानाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे,व्यसन प्रतिबंधक जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण देणे तसेच तणावमुक्ती, मित्रांच्या दबावाला सामोरे जाणे, योग्य निर्णयक्षमता विकसित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी युवकांना सक्षम करणे हा होता.यासोबतच विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानाची शपथ देण्यात आली.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री.प्रतापतराव भोसले हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग सचिन कवले, समाजकल्याण निरीक्षक अमोल कातगळे,डॉ.संदीप तांबारे, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने नशामुक्तीची शपथ घेतली.

तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांसाठी व्यसन प्रतिबंधक विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या वेळी सचिन कवले यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, “नशामुक्त धाराशिव घडविण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.व्यसनमुक्त समाज उभारण्यासाठी प्रत्येक तरुणाने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे.” आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात व्यापक जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांना केले. जिल्हा परिषदेच्या मल्टिपर्पज हायस्कूलमध्येही विद्यार्थी,शिक्षक आणि प्राचार्यांच्या उपस्थितीत नशामुक्ती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.व्यसनाचे दुष्परिणाम,आरोग्यावरील परिणाम आणि भविष्यातील धोके याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची शपथ घेत समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त केली.अभियानादरम्यान ऑफलाईन शपथ घेण्यासोबतच ऑनलाईन नशामुक्तीची शपथ घेऊन शासनाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहन समाजकल्याण निरीक्षक अमोल कातंगळे यांनी केले.या कार्यक्रमास गट विकास अधिकारी राजू कांबळे यांचीही उपस्थिती होती. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी केवळ जनजागृती पुरेशी नसून युवकांमध्ये तणाव हाताळण्याची क्षमता,सकारात्मक विचारसरणी, योग्य निर्णयक्षमता आणि जीवन कौशल्ये विकसित होणे आवश्यक असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.त्यासाठी विविध संवादात्मक उपक्रम,मार्गदर्शन सत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह यश मेडिकल फाऊंडेशनचे राजेश ताम्हाणे,स्वाती भातलवंडे आणि सुरज चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

व्यसनमुक्तीची शपथ घेताना अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि ‌‘व्यसनाला नाही' म्हणण्याचा निर्धार हेच या अभियानाचे खरे यश ठरले. विद्यार्थी,युवक,शिक्षक आणि विविध घटकांच्या सहभागामुळे जिल्ह्यात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक जनचळवळ निर्माण होत असून ‌‘नशामुक्त धाराशिव'चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जिल्हा आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.

 
Top