धाराशिव (प्रतिनिधी)- एकेकाळी आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेल्या ग्रामीण महिलांच्या हातात आज स्वतःच्या उत्पन्नाची चावी आहे.बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी केवळ कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकला नाही,तर समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या परिवर्तनामागे सातत्याने काम करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) धाराशिव जिल्हा कार्यालयाने वर्ष 2025-26 मधील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांचा सत्कार करून या यशाची दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सन 1995 पासून धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या माविमला आतापर्यंत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मान मिळाला नव्हता. मात्र मनुष्यबळाची कमतरता असतानाही तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आणि बचत गटांच्या महिलांच्या सक्रिय सहभागातून हे यश मिळवण्यात आले आहे.
माविमच्या कामगिरीकडे पाहिले असता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व्याप्ती लक्षवेधी ठरते. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी गावरान पोल्ट्री फार्म,उस्मानाबादी शेळीपालन,दाल मिल,दाल प्रक्रिया आदी उपक्रमांची उद्दिष्टपूर्ती शंभर टक्के करण्यात आली. बचत गटांच्या माध्यमातून बालविवाह निर्मूलन,हुंडाबंदी,दारूबंदी, कुपोषण निर्मूलन,वृक्षारोपण आणि महिला ग्रामसभा यांसारख्या सामाजिक उपक्रमांनाही चालना मिळाली आहे. त्यामुळे बचत गट हे केवळ आर्थिक व्यवहारांचे व्यासपीठ न राहता ग्रामीण समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र दिसून येते.