धाराशिव (प्रतिनिधी)- आस बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धाराशिवच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिव यांच्या वतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पिपल्स कॉलेज धाराशिव बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी भानु नगर धाराशिव येथे संपन्न झाला. यावेळी व्याख्याते व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सहदेव रसाळ व अध्यक्ष मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष धर्मवीर कदम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवी सुरवसे यांच्या हस्ते साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मवीर कदम यांचे प्रा. राम चंदनशिवे व सुनिल सुरवसे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. व्याख्याते प्रा. डॉ. सहदेव रसाळ यांचे पुष्पगुच्छ व शाल देवून प्रा.अंबादास कलासरे व दिपक कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. आण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील परिवर्तनवादी विचार यावर बोलताना सहदेव रसाळ म्हणाले की, आण्णाभाऊने प्रचलित साहित्यास छेद दिला आहे. त्याकाळी साहित्यातून उपेक्षित समाज, वेशीच्या बाहेर राहणारा समाज याचं दु:ख फारसं मांडल जात नव्हतं. त्या समाजाचे दु:ख आण्णाभाऊंनी साहित्यामध्ये मांडले. उपेक्षितांच्या दु:खास वाचा फोडले. साहित्यातून आण्णाभाऊंनी स्त्रियांना नायिका म्हणून उभे केले आहे. आण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषामध्ये प्रकाशित झाला आहे. फकीरा ही कादंबरी साहित्यातील माईल स्टोन आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दूसऱ्या दिवशी आण्णाभाऊंनी मोर्चा काढला व म्हणाले ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है म्हणून यलगार पुकारला होता. स्मशानातील सोनं, कोंबडी चोर या कथेतून आण्णाभाऊंनी गाव गाडयातील समाज व्यवस्थेतील उपेक्षित माणसांचे वास्तव चित्रण मांडले आहे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कामगारांच्या तळहातावर तरली आहे असे विधान करुन समाजातील अंधश्रध्दा व धर्म व्यवस्थेवर प्रहार केला आहे. जगबदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव असे म्हणून त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला आहे. आयुष्यात दीड दिवस शाळेत गेलेल्या आण्णाभाऊंचे साहित्य अजरामर झाला आहे. अध्यक्ष पदावरुन धर्मवीर कदम यांनी आण्णाभाऊ साहित्याचा आढावा घेवून म्हणाले की, आण्णाभाऊंची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा आण्णाभाऊचे साहित्य वाचून डोक्यात व ह्दयात ठेवले पाहिजे तशी कृती केली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक आर.डी. अंगरखे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त व्ही.एस. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. महादेव हारगे, बाळासाहेब माने, टी.एन. काझी, कमलाकर गायकवाड, प्रा. महेंद्र चंदनशिवे, ॲड. अनुरथ नागटिळक, नागनाथ गोरसे, अरुण राऊत, वाव्हळकर साहेब व शहरातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.


 
Top