धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी संकल्प प्रतिज्ञा दहा महिन्यांपूर्वी खामसवाडी येथे घेणारे संजय पाटील दुधगावकर यांचा शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना संजय दुधगावकर पाटील यांनी खरीप 2025 च्या पीकविमा मंजुरीतील असमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका शिवेवरील शेजारील दोन गावांमध्ये पीकविमा मंजूर करताना असमान पद्धत का ? त्याच प्रमाणे ज्या गावामध्ये पर्जन्यमापक नाही अशा गावांना शेजारील पर्जन्य मापकाचा आधार का ? या प्रश्नांचा सामान्य शेतकऱ्यांना उलगडा न झाल्याने व पीकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना न होता पीकविमा कंपनीला होत असल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे याची दखल शासनाने घ्यावी असे आव्हान त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. आगामी काळामध्ये भारत अमेरीका करारामुळे आयात शुल्क माफी दिल्यामुळे सोयाबीन, कापूस, मका व दुग्धजन्य पदार्थांची आयात होणार आहे त्यामुळे भाव पडणार असल्याने शेतकऱ्यांनी यापुढील काळामध्ये संघटीत होऊन भारत अमेरीका कराराला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आव्हान त्यांनी केले.

त्याच प्रमाणे कर्जमाफी करताना नियमित कर्ज भरणाऱ्यांवर रुपये 50 हजार रूपये अनुदान देऊन एक प्रकारे अन्याय केला आहे. तो अन्याय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रूपये प्रोत्साहन अनुदान देऊन खऱ्या अर्थाने संपूर्ण कर्जमाफी करावी असे आवाहन केले. प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने संजय दुधगावकर पाटील यांचा यथोचीत सत्कार केला याप्रसंगी मोहन पाटील, दयानंद पाटील, दिनेश खुने, चंद्रकांत पाटील, सुरेश माने, सुनिल पाटील, सतीश माने, संदीप जाधव, कुलदीप घावटे, अनिल रोहीले, शशीकांत पाटील, संजय पाटोळे, बबन सुरवसे, श्रीनिवास झोरी, परसराम कदम, अनिल सावत यांच्यासह शेतकरी,शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top