तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या महाद्वारासमोर वाढलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना होणारा त्रास अखेर कमी झाला आहे. मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महाद्वार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने भाविकांच्या ये-जा करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या दोन्ही महाद्वारांसमोरील परिसरात दुकानांसमोरील अतिक्रमणांसह बांगड्या विक्रेते आणि गंडेदोरे विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाद्वार परिसरातून जाणे-येणे सुलभ झाले आहे. बांगड्या विक्रेत्या महिलांसाठी प्रशासनाकडून भवानी रोडवर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, त्यानंतरही काही बांगड्या विक्रेत्या महिला थेट मंदिराच्या दोन्ही महाद्वारांच्या मध्यभागी बसून बांगड्यांची विक्री करीत असल्याचे चित्र दिसत होते. भाविकांची मोठी गर्दी असलेल्या या ठिकाणी विक्री केल्या जाणाऱ्या बांगड्या फुटल्यानंतर त्यांच्या काचेचे तुकडे परिसरात पडत होते. गर्दीमध्ये हे काचेचे तुकडे अनेकदा भाविकांच्या पायात घुसल्याच्या घटना घडत होत्या. विशेषतः मधुमेहाचा त्रास असलेल्या भाविकांसाठी पायाला झालेली जखम गंभीर ठरू शकते. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध आणि आजारी भाविकांनाही या फुटलेल्या बांगड्यांच्या काचा आणि वाढलेली गर्दी यामुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे महाद्वारासमोरील अतिक्रमण हटविल्याच्या कारवाईचे भाविकांकडून स्वागत होत असून, ही कारवाई केवळ काही दिवसांपुरती न राहता मंदिर परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
महाद्वार परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल होतात. सण, उत्सव आणि विशेष धार्मिक पर्वाच्या काळात ही गर्दी आणखी वाढते. अशा परिस्थितीत मंदिराच्या महाद्वारासमोरच दुकाने, विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी जागा व्यापल्यास भाविकांच्या सुरक्षिततेचा तसेच गर्दी नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने महाद्वारासमोरील अतिक्रमणावर सातत्याने लक्ष ठेवून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
